Category: मनोरंजन

  • ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

    ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!


    सॅन होजे (प्रतिनिधी) : ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेची स्थापना २०२४ मध्ये अमेरिकास्थित उद्योजक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून झाली आहे. नाफाने २०२४ पासून ‘मराठी चित्रपट महोत्सवा’द्वारे आणि भारतात प्रदर्शित होणाऱ्या तारखेलाच नवे चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा न घेणारी, स्वयंसेवकाच्या उत्साह आणि मेहनतीवर नावारुपाला आलेली ही संस्था अर्थात ‘नो प्रोफीट ओर्गनायझेशन’ येत्या नवीन वर्षात आपले मराठी ओटीटी सुरु करणार आहे.

    ‘नाफा स्ट्रीम'(NAFA STREAM) बद्दल बोलताना संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, ‘नाफा स्ट्रीम’ हे ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना आधार देणारे विदेशातील पहिले सामर्थ्यशाली माध्यम ठरणार आहे. प्रतिष्ठित तसेच उदयोन्मुख कलावंतांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, गेल्या पाच – सहा दशकांतील निवडक, अभिजात आणि दर्जेदार मराठी चित्रपट नॉर्थ अमेरिकन प्रेक्षकांसाठी एकाच व्यासपीठावर उपलब्ध असणे ही त्यांच्यासाठी पर्वणी असेल. या सोबतच चित्रपट निर्मात्यांसाठी पारदर्शक महसूल – वाटप मॉडेल विकसित करण्याचा ‘नाफा’ प्रयत्न करीत आहे. आज अनेक निर्माते आपली संपूर्ण पुंजी खर्चून, कुटुंबाची स्वप्ने बाजूला ठेवून, फक्त आपल्या कलाकृतीवरच्या प्रेमासाठी चित्रपट बनवतात. परंतु त्यांना योग्य मंच आणि योग्य परतावा फार क्वचित मिळतो. म्हणूनच ‘नाफा’ या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटीच्या माध्यमातून एक नावीन्यपूर्ण ‘इकोसिस्टम’ विकसित करण्यासाठी उत्सुक आहे.”

    ‘नाफा स्ट्रीम’ प्रोजेक्ट लीड अर्चना सराफ म्हणाल्या, “गेल्या दोन – अडीच वर्षांत ‘नाफा’ने अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मनात विलक्षण स्थान निर्माण केले आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन, महोत्सव, पुरस्कार सोहळे आयोजित करून निष्ठावान प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. ‘नाफा’चे ओटीटी पदार्पण निश्चितच मराठी मनोरंजनाला नवी उंची देईल. खास ‘नॉर्थ अमेरिकन’ चोखंदळ प्रेक्षकांसाठी ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटी असून महाराष्ट्रातील निर्माते – कलावंतांनी आमच्याशी थेट संपर्क केल्यास त्यांच्या कलाकृतींचा प्राधान्याने विचार केला जाईल.”

    ‘नाफा स्ट्रीम’ (NAFA STREAM) या ओटीटीवर नॉर्थ अमेरिकेतील प्रेक्षकांना गेल्या काही दशकांतील ‘कल्ट क्लासिक’ अर्थात प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेले मराठी चित्रपट, नवे चित्रपट, वादविवादामुळे, सेंसॉर मंजुरी न मिळालेले अथवा वितरणाच्या अडचणींमुळे आजवर प्रदर्शित न होऊ शकलेले दर्जेदार आशयघन चित्रपट, विविध विषयांवरील डॉक्युमेंट्रीज, वेबसीरिज, म्युझिक अल्बम्स, गाजलेल्या मराठी मालिका आणि बरेच काही एकाच प्लॅटफॉर्मवर नॉर्थ अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

    सध्या मराठी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असणारी, त्यांना आर्थिक महसूल मिळवून देणारी अत्यल्प माध्यमे, संस्था कार्यरत आहेत. ‘नाफा स्ट्रीम’ OTT मुळे निर्मात्यांसाठी ही यापूर्वी कधीच उपलब्ध नसणारी अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. ‘नाफा’ने निर्मात्यांचा विचार करून योग्य सन्मान करणारी इकोसिस्टम निर्माण करावी अशी अपेक्षा असणार आहे.

    निर्मात्यांसाठी थेट संपर्क
    NAFA STREAM Project Lead
    मेल : info@nafaglobal.org
    वेब : https://northamericanfilmassociation.org/

  • ‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

    ‘बोलविता धनी’: हृषिकेश जोशींच्या लेखणीतील नव्या नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

    मुंबई: प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी ‘बोलविता धनी’ या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात जोरदार चर्चा आहे. प्रवीण भोसले, भरत नारायणदास ठक्कर, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी आणि सुनंदा काळुसकर यांची निर्मिती असलेल्या ‘बोलविता धनी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन स्वतः हृषिकेश जोशी यांनी केले आहे. या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता क्षितीश दातेने नाटकातील आपल्या भूमिकेबद्दल आणि हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.

    क्षितीश ने या नाटकात दोन अत्यंत वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. तो सांगतो की, “या दोन्ही भूमिका एकमेकांपासून खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन वेगळी माणसं एकापाठोपाठ एक उभी करणं हे माझ्यासाठी थोडं आव्हानात्मक आहे. नाटक दोन काळांमध्ये चालत राहतं आणि नाटकाच्या नावाप्रमाणे ‘बोलविता धनी’ या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने नाटकात लागतो.” क्षितीशच्या मते, ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नसली तरी, “बोलविता धनी म्हणजे बोलणारा किंवा कृती करणारा एक असतो, पण पडद्यामागे राहून त्याला सूचना देणारा दुसराच कोणी असतो.”

    विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत त्याने साकारलेल्या लोकमान्य टिळक, एकनाथ शिंदे यांसारख्या नेतृत्वादी व्यक्तिरेखांच्या तुलनेत या नाटकात त्याची भूमिका कनिष्ठ पदाची आहे, पण एक अभिनेता म्हणून हेच आव्हान अधिक रंजक असल्याचं तो मानतो. हृषिकेशसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना क्षितीश म्हणाला, “मला हृषिकेश जोशींचं लिखाण प्रचंड आवडतं. त्यांची ‘नांदी’, ‘संयुक्त मानअपमान’ ही सगळी नाटकं मी पाहिली आहेत. शिवाय आता सुरू असलेल्या ‘मी व्हर्सेस मी’ या नाटकातही आम्ही दोघं एकत्र काम करतोय. त्यामुळे जेव्हा त्याने मला या नाटकासाठी फोन केला, तेव्हा मी काहीही विचार न करता लगेच हो बोलून टाकलं. नाटक काय आहे, वाचन कधी आहे, असल्या कोणत्याही गोष्टीत मी पडलो नाही; त्याने विचारलं त्याच क्षणी मी हो बोललो.”

    हृषिकेश यांच्या निवडक विनोदी शैलीमुळे हे नाटक सहकुटुंब पाहता येईल असं आहे. क्षितीश म्हणाला की, हृषिकेशचं हे कसब आहे की त्याने ही संपूर्ण टीम एकत्र आणली; त्याची कलाकार निवडीबाबतची पारख खूप चांगली आहे. या नाटकात विनोदाचं अंग खूप मोठं आहे. या नाटकात ओंकार कुलकर्णी, संग्राम साळवी, यांसारख्या कलाकारांसह एकूण १३ जण आहेत. महत्त्वाचे म्हणजे, “कोणाच्याही खिजगणतीत नाही अशा जुन्या नाटकांच्या इतिहासातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगावरती हे नाटक भाष्य करतं.”

    क्षितीश ला खात्री आहे की, १३ जणांना एकत्रित पाहण्याची जी मजा असते ती या नाटकात नक्कीच अनुभवायला मिळेल आणि ‘बोलविता धनी’ हे नाटक नाट्यरसिकांसाठी १०० टक्के पर्वणी असेल यात काही शंका नाही. ‘बोलविता धनी’ नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तर मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे

  • एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’

    एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’

    सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते “मॅजिक” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

    • १ जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

    अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं ‘मॅजिक’ काय आहे, असा प्रश्न या गुंतवून ठेवणाऱ्या ट्रेलरनं निर्माण केला आहे. नुकताच सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सायकोलॉजिकल पद्धतीनं गोष्ट उलगडणारा ‘मॅजिक’ हा चित्रपट नव्या वर्षात, १ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

    तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी मॅजिक या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘आई कुठे काय करते’सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात जितेंद्र जोशी एन्काउंटर स्पेशलिस्टच्या प्रमुख भूमिकेत असून, सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला आहे.

    एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट “मॅजिक” या चित्रपटात आहे. एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलिस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ… हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच मिळणार आहेत. प्रचंड गुंतागुंत, सायकोलॉजिकल गोष्ट, उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक आणि महोत्सवांमध्ये गौरवण्यात आलेला ‘मॅजिक’ हा चित्रपट १ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

  • सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!

    सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी!

    ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ शीर्षक गीत प्रदर्शित

    केदार शिंदे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आपल्या हटके नावामुळे आणि धमाकेदार टीझरमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सासू-सुनेच्या नात्यातील टोमणे, नोकझोक, प्रेम आणि मस्तीची मजेशीर बाजू या गाण्यातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

    हे शीर्षक गीत म्हणजे सासू-सुनेच्या रोजच्या नात्यातील गंमतीदार प्रसंगांचे संगीतमय रूप आहे. घराघरांत घडणाऱ्या मिश्किल टोमण्यांपासून खट्याळ तक्रारींपर्यंत आणि त्या मागील आपुलकीपर्यंत सगळ्या भावना या गाण्यात अचूक पकडल्या आहेत. त्यामुळे हे गाणे केवळ ऐकायला नाही, तर पाहायला आणि अनुभवायला देखील मजेदार आहे. चित्रपटाचा एकूण मूड, विनोद आणि कौटुंबिक भावनांचा समतोल हे गाणे सुरुवातीलाच ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

    या टायटल ट्रॅकला वैशाली सामंत आणि प्रियांका बर्वे यांचा दमदार आणि उत्साही आवाज लाभला असून त्यांच्या गायकीमुळे गाण्यातील नोकझोक आणि मस्ती अधिक जिवंत वाटते. कुणाल-करण यांचे संगीत हे या गाण्याचे खास आकर्षण ठरते. पारंपरिक ढंग आणि आधुनिक ठेका यांचा सुंदर मिलाफ साधत त्यांनी गाण्याला अशी चाल दिली आहे की, ती पहिल्याच ऐकण्यात लक्षात राहाते आणि नकळत गुणगुणायला भाग पाडते. ठेका, शब्द आणि सूर यांचा ताळमेळ गाण्याला अधिक खुसखुशीत आणि रंगतदार बनवतो.

    गीतलेखन वलय मुलगुंड यांचे असून त्यांच्या शब्दांतून सासू-सुनेच्या नात्यातील खट्याळपणा आणि आपुलकी सहजपणे उमटते. साधे, बोलके आणि लक्षात राहाणारे शब्द गाण्याला अधिक प्रभावी बनवतात. गाण्यात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे पारंपरिक नऊवारी साडीत कमाल दिसत असून त्यांची धमाल केमिस्ट्री आणि सहज अभिनय गाण्याच्या मस्तीला आणखी उठाव देतो. एकूणच हे गाणे ऐकायला जितके मजेदार आहे, तितकेच त्याचे सादरीकरणही लक्षवेधी ठरते.

    गाण्याबद्दल दिग्दर्शक केदार शिंदे म्हणतात, ‘’सासू-सुनेचे नाते हे कायमच रंजक, गंमतीशीर आणि भावनिक असते. ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या गाण्यात आम्ही त्या नात्याची खट्याळ बाजू मजेशीर पद्धतीने मांडली आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्कीच आवडेल आणि प्रत्येक मंगळागौर कार्यक्रमात ते वाजेल, याची मला खात्री आहे.”

    झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, सना शिंदे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची असून, छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा धमाल चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

    हृषिकेश जोशी यांचा ‘बोलविता धनी’ नक्की आहे तरी कोण?

    मुंबई: अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेले आणि लेखक-दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण केलेले अष्टपैलू कलाकार हृषिकेश जोशी हे रंगभूमीवर पुन्हा एकदा एका नव्या आणि अत्यंत रंजक विषयावर आधारित नाटक घेऊन येत आहेत. ‘अमरदीप + कल्पकला + सृजन थिएटर्स’ निर्मित, रसिकराज प्रकाशित आणि ‘सेरेंडिपिटी आर्ट्स’ च्या सौजन्याने साकारलेले हे नवे नाटक म्हणजे ‘बोलविता धनी’. नांदी नाटकानंतर हृषिकेश जोशी यांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून हे दुसरे मोठे नाटक असून, या प्रयोगाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    हृषिकेश जोशी यांनी हे नाटक वर्तमान सांस्कृतिक, समाजकारण आणि राजकारण यावर मार्मिक भाष्य करणारे असल्याचे सांगितले आहे. एनएसडीच्या फॉर्मर डिरेक्टर अनुराधा कपूर यांनी ‘गोष्ट संयुक्त मानापनाची’ या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर हृषिकेश यांना या नाटकाच्या विषयावर लेखन करण्याची कल्पना सुचवली.

    विनोदाचा आणि वास्तवतेचा सुरेख संगम

    ‘बोलविता धनी’ हे केवळ भाष्य करणारे नाटक नसून, ते एक रंजक आणि परिपूर्ण मनोरंजन आहे. यात भरपूर विनोद आहे, उत्तम ड्रामा आहे, एक सुंदर लव्हस्टोरी आहे आणि काही जुन्या घटनांचे संदर्भही यात पहायला मिळतील. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही गोष्ट एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास हृषिकेश जोशी व्यक्त करतात.

    कलाकारांची मोठी फौज

    या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेले क्षितीश दाते, संग्राम साळवी, ओंकार कुलकर्णी, मयुरा रानडे, सिमरन सईद यांसारखे ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्यासह प्रद्युम्न गायकवाड, परमेश्वर गुट्टे, निरंजन जावीर, सागर यार्दी, अजिंक्य पोंक्षे, दीपक गोडबोले, निलेश गांगुर्डेहे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसतील. विशेष म्हणजे, या नाटकात रंगभूमीच्या पडद्यामागील महत्त्वाचे कलाकार म्हणजेच मेकअपमन, प्रोडक्शन मॅनेजर, हेअर ड्रेसर आणि वेशभूषाकार हे व्यावसायिकही पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत, जे या नाटकाचे वेगळेपण अधोरेखित करते.

    हृषिकेश जोशी यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून साकारलेला हा ‘बोलविता धनी’ कोण आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगांना नक्की हजेरी लावावी. येत्या १३ डिसेंबरला रात्री ९.३० वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे, मुंबई मधील शुभारंभ २४ डिसेंबर दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे ‘बोलविता धनी’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे

  • नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परबचा गोट्या गँगस्टर

    नाताळच्या सुट्टीत येतोय प्रथमेश परबचा गोट्या गँगस्टर

    “गोट्या गँगस्टर” चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच

    राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा अनोखा टीजर लाँच करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गोट्या भाय या गाण्यावरचा हा टीजर लक्षवेधी असून, नाताळच्या सुट्टीत २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित गोट्या गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुतकर्ता आणि सहनिर्माता ऋतुजा पाटील , शिव लोखंडे आहेत तसेच अससोसिएट निर्माता शिवाकांत तिवारी आहेत . राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

    मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर
    किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. आणि त्यानंतर सुरू होतात विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, खुसखुशीत संवाद, दमदार दिग्दर्शन, उत्तम अभिनय या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

    बाबू बँड बाजा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यांनी गोट्या गँगस्टर चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र, त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळे आता त्यांचा शेवटचाच चित्रपट ठरलेला गोट्या गँगस्टर आता २६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

  • शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस

    शाळेच्या मैदानात परतले चित्रीकरणाचे दिवस

    मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच एका अनोख्या आणि भावनिक वातावरणात प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले, त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला.
    वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला.

    ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या चित्रपटात बंद होत असलेल्या मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये दिसते की, शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना, अनेक वर्षांनंतर त्या शाळेचे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येतात आणि आपल्या शाळेला वाचवण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहातात. या पुनर्भेटीत ते आपल्या शालेय आयुष्यातील खोडकरपणा, मैत्री, शिक्षकांची शिस्त, शिक्षा, दंगा-मस्ती आणि निरागस क्षणांना पुन्हा एकदा जगतात. हा ट्रेलर नॉस्टॅल्जियाने भरलेला असून तो प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडत आहे. तसेच हा ट्रेलर मजेशीर, नॉस्टॅल्जिक असतानाच आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील विषयावर नेमके बोट ठेवताना दिसतो. मराठी शाळा बंद पडण्याच्या चर्चेत असताना, हा चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे आणि मराठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.

    दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ महाराष्ट्रातल्या कमी होत जाणाऱ्या मराठी शाळा ही वस्तुस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही एक मजेशीर, भावनिक आणि तरीही वास्तवाशी जोडलेली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शाळेत शूटिंग केले, तिथेच ट्रेलर अनावरण सोहळा करणे हा आमच्यासाठी खास अनुभव होता. या निमित्ताने आमच्या चित्रीकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना देखील त्यांच्या शाळेची आठवण होईल व मराठी शाळेचे महत्त्व कळेल याची मला खात्री आहे.”

    ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या ट्रेलर मधून अजून एक सरप्राईज समोर आलंय ते म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.

    चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

    मजा… मस्ती… धमाल… आणि आठवणींचे गोड रियुनियन!

    जणू काळ थांबावा आणि हे सगळं पुन्हा एकदा उभं राहावं… ट्रेलर लाँचच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रांतिज्योतीच्या शाळेच्या पटांगणात चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीम एकत्र जमली आणि रंगली आठवणींची, हसण्याची आणि धमाल मस्तीची मैफल. या खास कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या गोंडस ‘नाटके मोरा’ या नृत्याने झाली. त्यानंतर रोहित जाधवने आपल्या दमदार आवाजात गायलेलं ‘शाळा मराठी माझी’ गाणं ऐकताना क्षणभर सगळेच आपल्या शालेय दिवसांत हरवून गेले.

    कलाकारांनी मिडियासोबत ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्यावर थिरकत कार्यक्रमात रंगत आणली. खेळ, गप्पा, हास्य आणि मोकळ्या आठवणी यामुळे संपूर्ण वातावरण चैतन्यमय झालं. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रपटातील मुख्याध्यापकांच्या भूमिकेत असलेले सचिन खेडेकर यांनी सगळ्यांना शाळेची सैर घडवली. प्रत्येक वर्ग, प्रत्येक कोपरा जणू काही जुन्या आठवणींचं दार उघडत होता. एकंदरच हा ट्रेलर लाँच सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा, मनाला हळुवार स्पर्श करणारा मजा… मस्ती… आणि धमाल अनुभव ठरला.